विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
गडचिरोली / एटापल्ली 13:-
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गट्टा परिसरातील गर्देवाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय बालकावर मलेरियाचा गंभीर प्रादुर्भाव झाला असताना, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या तत्पर हालचालींमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास दुर्मीळ 'बी-निगेटिव्ह' रक्तगटाच्या रक्तपिशव्यांची वेळेवर उपलब्धता करून देत आरोग्य यंत्रणेने समन्वय आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.
घटनेचा तपशील:
मूळ गाव मेढरी येथील आमिर कवडो (वय ८ वर्षे) हा गर्देवाडा आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. २७ ऑगस्ट रोजी त्याला मिश्र प्रकारच्या (Mixed) मलेरियाची लागण झाल्याचे निदान झाले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर पालकांच्या विनंतीनुसार आश्रमशाळा प्रशासनाने त्याला घरी सोडले. मात्र, १ सप्टेंबर रोजी त्याला लघवीतून रक्तस्त्राव (हिमॅच्युरिया) होण्यास सुरुवात झाली. स्थानिक स्तरावर उपचारात वेळ गेल्यानंतर प्रकृती खालावल्याने आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्याच रात्री १० वाजता त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा येथे दाखल करण्यात आले.
अतिगंभीर प्रकृती आणि तातडीचे उपचार
प्राथमिक तपासणीत आमिरचे हिमोग्लोबिन अवघे ४.५ ग्रॅमपर्यंत घसरले होते, तर ऑक्सिजन पातळी (SpO₂) ७३ टक्क्यांवर पोहोचली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने ऑक्सिजन सपोर्ट देत त्याला काली अम्मल रुग्णालय (LKAM), हेडरी येथे रेफर केले.
मध्यरात्री दुर्मीळ रक्ताची जुळवाजुळव:
बालकाचा रक्तगट 'बी-निगेटिव्ह' (B Negative) हा अत्यंत दुर्मीळ असल्याने रक्ताची उपलब्धता हे मोठे आव्हान होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मध्यरात्री २:३० वाजता रक्ताची पहिली पिशवी उपलब्ध केली. यासाठी आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडस्कर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून महत्त्वाची मदत केली.
उपचार करणाऱ्या बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती यांनी बालकाची प्रकृती पाहता आणखी दोन रक्तपिशव्यांची गरज व्यक्त केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे व जिल्हा हिवताप विभागाशी समन्वय साधून दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा मुख्यालयातून आणखी दोन 'बी-निगेटिव्ह' रक्तपिशव्या तातडीने अहेरीमार्गे रुग्णालयात पोहोचवण्यात आल्या.
*प्रकृतीत लक्षणीय सुधारणा:*
वेळेत तीन रक्तपिशव्यांचा पुरवठा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारामुळे आमिरचा लघवीतील रक्तस्त्राव थांबला. त्याचे हिमोग्लोबिन ४.५ वरून ९.२ ग्रॅमपर्यंत वाढले असून त्याला व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे.
*प्रशासनाकडून कौतुक:*
अतिदुर्गम भागात तालुका, उपजिल्हा आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणेने दाखवलेली तत्परता जीवनदायी ठरली. डॉ माधव शिंदे जिल्हा हिवताप अधिकारी, एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे, डॉ. अनिकेत तिपटे, डॉ. लाडस्कर तसेच काली अम्मल रुग्णालय हेडरी येथील वैद्यकीय चमूच्या समन्वयाचे व अहोरात्र घेतलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
डॉ प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी

Post a Comment
0 Comments