राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9518368177
गोंडपिपरी : गोंडपिपरी पोलीस ठाण्यात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांची मुल येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी (दि. २९) गोंडपिपरी पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारली.
हत्तीगोटे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. विविध गुन्हे व प्रकरणांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज करत त्यांनी पोलिस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. बदलीनंतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना निरोप देण्यात आला.
दरम्यान, नवनियुक्त ठाणेदार हेमंत पवार यांच्यासमोर गोंडपिपरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे आव्हान आहे. विशेषतः अवैध दारूविक्री, जुगार, सट्टा आणि इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींची तत्पर दखल, गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि पोलिस-नागरिक समन्वय या मुद्द्यांवर नवे ठाणेदार कोणती भूमिका घेतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments