Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गुरुपल्लीतील बंद हातपंप तात्काळ दुरुस्त करा; CPIची मागणी




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

८२०८१६६९६१/९८६००२००१६


एटापल्ली : ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत गुरुपल्ली गावातील श्री. विलास मटाटामी यांच्या घरासमोर असलेला हातपंप मागील काही काळापासून बंद पडला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


हातपंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. गावात सोलर ड्युअल पंपाची सुविधा उपलब्ध असली तरी तो सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्याने रात्री तसेच सूर्यप्रकाश कमी असताना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे बंद पडलेला हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


गुरुपल्ली गावातील नागरिकांनी ही समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मांडली. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन कॉ. सचिन मोतकुरवार आणि CPIचे जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांनी पंचायत समिती एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत बंद हातपंपाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.


“गुरुपल्लीतील नागरिकांनी पाण्याची समस्या आमच्याकडे मांडली आहे. पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे. गावात पाण्याची साधने उपलब्ध असतानाही दुरुस्तीअभावी हातपंप बंद राहणे योग्य नाही. सोलर पंपावर मर्यादा असल्यामुळे बंद हातपंप तातडीने दुरुस्त करून नागरिकांना पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली.


यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह गुरुपल्ली गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे हातपंपाची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून हातपंप कार्यान्वित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


हातपंपाची दुरुस्ती प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments