विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
अहेरी : अहेरी येथील 100 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयात IPHS 2022 नुसार आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे व आपत्कालीन सेवा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) वतीने करण्यात आली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला निवेदन देऊन उपलब्ध सुविधा व प्रत्यक्ष कार्यरत व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
अहेरी महिला व बाल रुग्णालय हे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीतील रुग्णालय असल्याने IPHS 2022 नुसार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. विशेषतः प्रसूती व स्त्रीरोग विभाग, 24 तास Labour Room, आपत्कालीन प्रसूती सेवा, C-Section सुविधा, Obstetric HDU, Obstetric ICU, बालरोग विभाग, Pediatric HDU, नवजात बालकांसाठी आवश्यक सुविधा, रक्तसाठा, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णवाहिका सेवा यांची उपलब्धता व प्रत्यक्ष कार्यस्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
IPHS 2022 नुसार 100-बेड उपजिल्हा रुग्णालयासाठी अपेक्षित असलेल्या गंभीर रुग्णसेवांमध्ये Obstetric HDU, Obstetric ICU आणि Pediatric HDU यांचा समावेश आहे. त्यामुळे या सुविधा अहेरीच्या रुग्णालयात मंजूर आहेत का, प्रत्यक्ष किती बेड उपलब्ध आहेत आणि त्या 24 तास कार्यरत आहेत का, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “अहेरीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील महिला व बालकांसाठी हे रुग्णालय जीवनदायी ठरणे अपेक्षित आहे. 100 खाटांचे रुग्णालय म्हणून त्याला दर्जा दिल्यानंतर IPHS 2022 नुसार आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ इमारत उभी करून किंवा कागदोपत्री सुविधा दाखवून आरोग्य सेवा सक्षम होत नाही. प्रसूतीच्या वेळी डॉक्टर, रक्त, ऑपरेशन थिएटर किंवा आपत्कालीन उपचार उपलब्ध नसतील तर त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या जीवावर होऊ शकतो.”
“IPHS 2022 नुसार नेमक्या कोणत्या सुविधा रुग्णालयाला मंजूर आहेत, त्यापैकी किती सुविधा प्रत्यक्ष उपलब्ध आहेत आणि किती कार्यरत आहेत, याचा संपूर्ण हिशेब प्रशासनाने जनतेसमोर ठेवावा. मंजूर पदे रिक्त ठेवणे, आवश्यक उपकरणे बंद ठेवणे किंवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना दुसरीकडे रेफर करणे ही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही. महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने आणि कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, रेडिओलॉजी तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला व बालकांच्या उपचारामध्ये औषधे, रक्त, तपासण्या, आहार आणि रुग्णवाहिका यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव राहिल्यास त्याचा थेट परिणाम गरीब व ग्रामीण रुग्णांवर होतो. त्यामुळे JSSK अंतर्गत पात्र महिला व बालकांना मिळणाऱ्या मोफत सुविधांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, याचीही माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मागील 12 महिन्यांतील प्रसूती, C-Section, गंभीर रुग्णांचे referral, मातृ मृत्यू, नवजात मृत्यू तसेच बालमृत्यू यांची आकडेवारी आणि संबंधित Death Audit/Review अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
“कागदावर सुविधा मंजूर असून प्रत्यक्षात उपलब्ध नसतील किंवा उपलब्ध असूनही कार्यरत नसतील, तर त्याची जबाबदारी संबंधित आरोग्य प्रशासनाची निश्चित करण्यात यावी. महिला व बालकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशारा CPIच्या वतीने देण्यात आला.
IPHS 2022 नुसार अपुऱ्या असलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, रिक्त पदे भरावीत, बंद उपकरणे दुरुस्त करावीत आणि 24×7 आपत्कालीन सेवा सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने 15 दिवसांच्या आत समाधानकारक माहिती व कार्यवाही न केल्यास वरिष्ठ आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, CPI; कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य; कॉ. नेहा नारलावार, NFIW; कॉ. पदमा मुनूरवार, NFIW यांच्यासह इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments