शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांकडे निवेदन;
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली, दि. १ ऑक्टोबर २०२६ :
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
शिवसेना ओबीसी विभागाचे गडचिरोली–चिमूर लोकसभा संघटक नरेंद्रभाऊ कंदीकुरवार यांच्या नेतृत्वाखाली १ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राज्याचे मंत्री आशिषजी जयस्वाल यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीच्या निकषांमध्ये जिल्ह्याचा अपेक्षित समावेश झालेला नसल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शेतीवर अवलंबून असल्याने नैसर्गिक आपत्ती अथवा शेतीचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री निकषांवर निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी, नुकसानीचे पंचनामे आणि तालुकानिहाय परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पाहणी करून निर्णय घ्यावा
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा. त्यानंतर परिस्थितीचा विचार करून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त घोषित केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध दुष्काळ निवारण उपाययोजनांचा व मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनावर अशोकदादा धुर्वे (माजी उपजिल्हा प्रमुख, अहेरी विधानसभा), बिरजू भाऊ गेडाम (वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख), विनेश तोटावार (अहेरी शहर प्रमुख) आणि आयुष एस. मामीडवार (अहेरी शहर संघटक) तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा वस्तुनिष्ठ विचार करून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाची तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी,” अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments