Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्लीच्या वतीने गणेशोत्सवातील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

 


विद्यार्थी व पालकांचा मोठ्या संख्येने सहभाग; मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

एटापल्ली, दि. २८ सप्टेंबर : श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ, बस स्थानक एटापल्ली यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी आदिवासी गोटूल भवन, एटापल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

गणेशोत्सव २०२६ निमित्त मंडळाच्या वतीने अंताक्षरी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये एटापल्ली शहरातील अनेक विद्यार्थी, महिला व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.

सदर बक्षीस वितरण सोहळ्यात एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेखा मोहुर्ले, माजी पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार, विजय गजाडीवार, विलास चिटमलवार, राजगोपाल सुल्वावार व संतोष गंधेशिरवार यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.

बक्षीस वितरण सोहळ्याला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्याच्या मंडळाच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, ओमकार मोहुर्ले, प्रणय कासवटे, जितेंद्र चिलवेलवार, अनिकेत मामीडवार, महेंद्र सुल्वावार, पवनकल्याण गोमासे, तनुज बल्लेवार, सुशीला रच्चावार, स्वाती पत्तीवार व भाग्यलक्ष्मी सुल्वावार यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच विविध स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख अमोल गजाडीवार, स्पर्धा प्रमुख पूजा पुल्लूरवार व मंडळाचे उपाध्यक्ष संपत पैडाकुलवार यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवातील स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments