महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांची उपोषणस्थळी भेट व जाहीर पाठिंबा
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
तळा :- विमानतळ निर्मितीसाठी शासनाने काढलेला 12 मे 2026 रोजीचा वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज, 2 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी, राखी-गुरवळा येथील आंबेडकर चौक परिसरातील पटांगणात बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
विमानतळाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी यापूर्वी विविध टप्प्यांवर निवेदने, आंदोलने तसेच शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध असून, ही भूमिका त्यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अनेक निवेदने आणि आंदोलने करूनसुद्धा शासनाच्या निर्णयात बदल झालेला नाही.
गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेले हे बेमुदत साखळी उपोषण शेतकऱ्यांनी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू केले आहे. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या भावना व मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. 12 मे 2026 रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करून या निर्णयाचा विचार करावा, अशी मागणी महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घ्यावी. शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असा स्पष्ट इशाराही महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेना नेते हेमंत भाऊ जंबेवार, रिपब्लिक पार्टी केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदासजी राऊत साहेब, जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी राज बन्सोड, प्राचार्य प्रकाशजी दुबे, प्राध्यापक राजम बोरकर, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, दिवाकर निसार,तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे,धिवरू मेश्राम,हरिजी मडावी,अनिल कोठारे,अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे सह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments