Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जारावंडी ग्रामपंचायतीसमोरील प्रलंबित प्रश्नांसाठी अखेर बेमुदत उपोषणाला सुरुवात

 


विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

 एटापल्ली:- ग्रामपंचायतीतील विविध प्रलंबित प्रशासकीय व विकासात्मक प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुकेश कावळे व योगेश कुमरे यांनी आज, ५ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कार्यालय, जारावंडी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे विविध निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.


जारावंडी ग्रामपंचायतीस नियमित व पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देणे, वारंवार तहकूब होणाऱ्या ग्रामसभा सुरळीत घेणे आणि ग्रामस्थांची प्रलंबित कामे मार्गी लावणे, या प्रमुख मागण्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या सामान्य निधी, घरपट्टी निधी, ग्रामकोष, PESA व विविध शासकीय निधीच्या मागील व्यवहारांची चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, विकासकामे व खरेदी प्रक्रियेची तपासणी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.


याशिवाय जारावंडी येथील मामा तलाव मच्छी लिलाव प्रकरणाची चौकशी, आठवडी बाजारातील अस्वच्छता व वसुलीबाबतच्या तक्रारींची चौकशी, तसेच गावातील रस्ते, नाले, पथदिवे, पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्राचा रस्ता, शाळा परिसर, तलाव व स्वच्छतेच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, एटापल्ली तालुक्यातील कथित बोगस डॉक्टरांची चौकशी करून संबंधितांची वैद्यकीय पात्रता व नोंदणी तपासावी आणि चौकशीत नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास आहेत किंवा नाहीत, याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव तसेच मागील एक वर्षातील वेतन व संबंधित परिपत्रकांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.


"यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले; मात्र ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे लोकशाही व शांततामय मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी," अशी भूमिका उपोषणकर्ते मुकेश कावळे व योगेश कुमरे यांनी व्यक्त केली


 *कारवाईला एवढा विलंब का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह; ‘कुठे पाणी मुरतंय?’* 


जारावंडी ग्रामपंचायतीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत यापूर्वी वारंवार निवेदने व तक्रारी देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढे दिवस होऊनही कारवाई का झाली नाही? नेमके कोणत्या स्तरावर प्रकरणे प्रलंबित आहेत? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


ग्रामसेवकाचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या निधी व आर्थिक व्यवहारांची चौकशी, विकासकामे, मच्छी लिलाव, आठवडी बाजारातील समस्या, मूलभूत सुविधा तसेच कथित बोगस डॉक्टरांवरील कारवाई अशा विविध मागण्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने “कुठे पाणी मुरत आहे? कोणाच्या आशीर्वादाने ही प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहेत?” असा सवाल उपोषणकर्त्यांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने विलंबाचे कारण स्पष्ट करून संबंधित प्रकरणांवर तातडीने चौकशी व ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments