CPI ची मागणी; मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
मो. 8208166961
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेटळकसा परिसरात नॅचरल रिसोर्सेस एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित लोहखनिज खाणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) खाणीसंबंधित कामे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पाचे व्हिजन, पर्यावरण रक्षण, विस्थापनावरील उपाययोजना, स्थानिक शेतीचे संरक्षण आणि रोजगाराच्या संधी याबाबत CPI च्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेऊन सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी (महसूल), एटापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कंपनी आणि प्रशासनाने अद्याप ग्रामस्थांना प्रकल्पाचे स्वरूप व संभाव्य परिणाम याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रथम नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निरसन करावे आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अशी भूमिका CPI ने मांडली आहे.
खाण प्रकल्पामुळे जंगल, पर्यावरण, जलस्रोत आणि शेतीवर होणारे संभाव्य परिणाम स्पष्ट करावेत. विस्थापनाची परिस्थिती निर्माण झाल्यास बाधित कुटुंबांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, याची माहिती द्यावी. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना किती कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे, याची आकडेवारी जाहीर करून स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार देण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “हेटळकसा येथील प्रस्तावित खाण बंद करून पर्यावरण, जंगल, शेती आणि स्थानिक जनतेचे हित जपणाऱ्या शाश्वत विकासावर भर द्यावा. CPI च्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेऊन रोजगार व विस्थापनाबाबत लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
प्रकल्पाबाबत स्पष्ट माहिती, लेखी आश्वासने आणि नागरिकांची बैठक होईपर्यंत खाणीसंबंधित कामे, यंत्रसामग्रीची तपासणी व चाचणी बंद ठेवण्यात यावी. मागण्यांकडे दुर्लक्ष करून काम पुढे रेटल्यास स्थानिक जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा CPI ने दिला आहे.
हे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार आणि कॉ. सुरज जककुलवार यांच्या वतीने सादर करण्यात आले असून, त्यासोबत हेटळकसा गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या जोडण्यात आल्या आहेत.

Post a Comment
0 Comments